श्री तुळजाभवानी मंदिराची वैशिष्ट्ये
१. तुळजाभवानी मंदिरातील छबीना
एका चांदीच्या मेघ्डंबरीमध्ये देवीच्या अनेक वाहनापैकी एका वाहनावर देवीची चांदीची मुर्ती व पादुका ठेवून मंदीरा भोवती एक प्रदिक्षिणा पुर्ण करतात याला छबिना म्हणतात.
श्री तुळजाभवानी मातेचा छबिना प्रत्येक मंगळवार, पौर्णिमेच्या अगोदरचा एक दिवस, पौर्णिमेचा दिवस, पौर्णिमेनंतरचा एक दिवस याप्रमाणे करण्यात येतो व फाल्गुन पौणिमेचा छबिना गुडीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो. वर्षातील २१ निद्रा कालामधील मंगळवारी देवी शयन ग्रहामध्ये निद्रीस्त असल्यामुळे छबिना काढला जात नाही. बाकी वर्षभरात वरील प्रमाणे छबिना काढण्यात येतो. निद्रा कालावधीमध्ये स्थानिक भक्त पुजारी जोगवा मागत नाहीत.
२. भेंडोळी उत्सव
तुळजाभवानी मंदिर परिसरात श्री काळभैरवाचे मंदिर एका उंच डोंगरावर आहे. श्री काळभैरव हा तुळजाभवानीचे रक्षण करतो असे मानले जाते. वर्षातून एकदाच आश्विन अमावास्येला श्री काळभैरव तुळजाभवानीच्या मंदिराची व परिसराची पाहणी करण्यासाठी रात्रीच्या वेळी त्याच्या मंदिरातून बाहेर येतो असे मानले जाते. त्यासाठी प्रकाशाची आवश्यकता असते म्हणून भेंडोळी उत्सव साजरा केला जातो. भेंडोळी म्हणजे एका मोठ्या व लांब लाकडाच्या ओंडक्याला एका बाजूस तेलात बुडवलेली सूती कापडे गुंडाळलेली असतात. हा ओंडका वर्षभर काळभैरव मंदीरासमोर असतो. आश्विन अमावास्येला दिवसभर तुळजापुरतील रहिवासी श्री काळभैरवाचे दर्शन घेऊन खोंडबळ्याची माळ अर्पण करतात, नारळ फोडतात आणि भेंडोळीवर तेल घालतात. मग रात्रीच्या वेळी भेंडोळी पेटवून पेटती भेंडोळी पुजारी तरुण श्री काळभैरव मंदिरातून बाहेर काढून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मंदिरात आणतात. देवीचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा झाल्यानंतर मंदिरातून बाहेर आणत शहरातील कमानवेस या वेशीजवळ मारुती मंदिर येथे ही भेंडोळी विझवली जाते. हा प्रचंड मोठा एका बाजूने जळता लाकडी ओंडका शहरातील पुजारी तरुण आपल्या हातांनी उचलून श्री काळभैरव मंदिर ते कमान वेस असा अरुंद गल्लीबोळांतून, शेकडो पायर्यांवरून 'भैरोबाच्या नावानं चांगभलं, आई राजा उदो उदो' असा जयघोष करत प्रवास करतात हे विशेष. हा प्रकाशाचा उतस्व पाहण्यासाठी व भेंडोळीवर तेल, तूप घालण्यासाठी शहरातील नागरिक या मार्गावर प्रचंड गर्दी करून उपस्थित असतात.
हा भेंडोळी उत्सव भारतात दोनच ठिकाणी साजरा केला जातो. काशी येथे व तुळजापूर येथे.
Comments
Post a Comment